विज्ञानाने केलेली प्रगती आणि विविध शोध त्याचप्रमाणे जीवसृष्टीतील विविध प्राणीमात्रांची माहिती देणाऱ्या ‘विज्ञान एक्स्प्रेस-जैवविविधता विशेष’ या फिरत्या प्रदर्शनाला मुंबईकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अवघ्या दोन दिवसात या प्रदर्शनाला १९ हजारहून अधिक विज्ञानप्रेमींनी भेट दिली असून यात साडेचार हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पर्यावरण, वन मंत्रालयाने त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने तयार केलेले विविध शोध आणि बदलांची माहिती देणारे प्रदर्शन घेऊन फिरणारी ‘विज्ञान एक्स्प्रेस-जैवविविधता विशेष’ ही खास रेल्वे गाडी मुंबईकरांच्या भेटीस आली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील फलाट क्रमांक १३ वर उभ्या करण्यात आलेल्या या गाडीचे रविवारी सकाळी उदघाटन झाल्यावर रविवारच्या सुटीचा फायदा घेत तब्बल आठ हजार लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये मुंबईतल्या १३ शाळांमधील सातशे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांचा समावेश होता.
सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंतच नऊ हजाराहून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये ४५ शाळांमधील अडीच हजार विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांचा समावेश होता. कामावर जाणाऱ्या सहा हजार मुंबईकरांनीही वेळात वेळ काढून या प्रदर्शनाला भेट दिल्याचे सांगण्यात येते. बुधवापर्यंत ही गाडी मुंबईकरांचे वैज्ञानिक कुतुहल शमविणार आहे. या जैवविविधता एक्स्प्रेसमध्ये भारताची भौगोलिक स्थिती, पशुपालन, कृषी संशोधन, विविध प्रांतातील कृषी विकास तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातली यशस्वी संशोधन आदींची विस्ताराने माहिती देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment